कोलकाता (पश्चिम बंगाल) - यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोलकातामधील एका विशेष न्यायालयाने समन्स जारी केले आहे. तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मानहानी प्रकरणी याचिका दाखल केली होती. 22 फेब्रुवारीला वैयक्तीक किंवा वकिलामार्फत न्यायालयात दाखल व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अमित शाह यांना 22 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता वैयक्तीक किंवा वकिलामार्फत हजर राहण्याचे निर्देश आहेत. अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बासू यांनी दावा केला, की अमित शाह यांनी 11 ऑगस्ट 2018 रोजी कोलकाताच्या मेयो रोड येथे भाजपच्या मेळाव्यात अभिषेक बॅनर्जी यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केले होते.
अभिषेक बॅनर्जी कोण आहेत?
अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर आणि दक्षिण 24 परगनाचे प्रतिनिधीत्व करतात. पक्षात दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. 2011 मध्ये झाले राजकारणात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांचे भाऊ अमित बॅनर्जी यांचे ते पुत्र आहेत. तर काही दिवसांपूर्वी घराणेशाहीवरून मोदींना आव्हान दिलं होतं. केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन, असं अभिषेक यांनी म्हटलं होतं. तसेच माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले. तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईल, असंही म्हटलं होतं.
प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने 211 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.