नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका दिवसात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
दिल्लीतील रुग्णसंख्येत वेगाने वाढ -
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 84 हजार 825 रुग्ण संसर्गातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 11 लाख 17 हजार 531 इतकी नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे दररोज बरे होणाऱ्यांचा दर 13.11 टक्के इतका आहे. दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाच्या नवीन रूग्णांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात येथे 27 हजार 561 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी 20 एप्रिल 2021 पासून एका दिवसातील सर्वाधिक नोंद आहेत.
कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार ओमीक्रॉनच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत या प्रकारच्या कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 5 हजार 488 आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. तसेच यापैकी बरेच लोक बरे होऊन मायदेशी किंवा परदेशात परतले आहेत.