मुंबई : ज्येष्ठ तेलुगु कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव यांच्या जामीन अर्जाबाबत उच्च न्यायालयाने एनआयएला निर्देश दिले आहेत. वरावरा राव यांच्या अर्जावर सुनावणी करताना, त्यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार केला जावा, असे न्यायालयाने एनआयए आणि महाराष्ट्र सरकारला सांगितले आहे. पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणी राव यांना २०१८मध्ये अटक करण्यात आली होती.
राव सध्या नानावटी रुग्णालयात..
राव यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, अशी याचिका त्यांच्या पत्नीने दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, नानावटी रुग्णालयामार्फत त्यांच्या तब्येतीचा अहवाल नियमितपणे उच्च न्यायालयात दाखल केला जात आहे.
वयाचा आणि प्रकृतीचा विचार करा..
वरावरा राव हे ८१ वर्षांचे आहेत. तसेच, त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. त्यामुळे जामिन अर्जाबाबत सबमिशन करताना या दोन्ही गोष्टींचा विचार केल जावा, असे न्यायमूर्ती शिंदे म्हणाले.
गेल्यावर्षी जुलैमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, नंतर त्यांना पुन्हा तळोजा कारागृहात नेण्यात आले होते. तसेच, त्यापूर्वी त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयातही उपचार करण्यात आले होते. मात्र, प्रत्येक वेळी जामीन देण्याऐवजी त्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात आले होते.
कोणत्या प्रकरणी राव अटकेत?
पुण्याच्या शनिवार वाड्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. एल्गार परिषदेनंतर कोरेगाव-भीमा याठिकाणी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेदरम्यान चिथावणीखोर भाषण करत हिंसा घडवून आणल्याचा आरोप वरावरा राव यांच्यासह इतर नऊ जणांवर लावण्यात आलेला आहे. परिषदेच्या आयोजनात सहभाग असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील काहींची जामीनावर सुटका झाली. मात्र, राव अद्यापही तुरुंगात आहेत.
हेही वाचा : केंद्राने लस मोफत दिली नाही, तर आम्ही देऊ; केजरीवाल यांचे दिल्लीकरांना आश्वासन