नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यानंतर त्यांना त्यांचे घर देखील रिकामे करण्याची नोटीस आली. आता काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्त्याने राहुल गांधींना त्यांचे घर दिले आहे. मंगोलपुरीच्या रहिवासी राजकुमारी गुप्ता यांनी आपले चार मजली घर राहुल गांधींच्या नावे केले आहे. राजकुमारी गुप्ता यांनी घराच्या सर्व कागदांवर राहुल गांधींचे नाव लिहिले आहे. त्या ज्या वसाहतीत राहतात ती वसाहत इंदिरा गांधींच्या काळात स्थापन झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राहुल गांधींना भाऊ मानतात : मंगोलपुरी येथील रहिवासी असलेल्या राजकुमारी गुप्ता गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसशी जोडलेल्या आहेत. त्या सातत्याने काँग्रेस पक्षासाठी कार्यरत आहेत. राजकुमारी गुप्ता म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांत राहुल गांधींसोबत घडलेल्या घटनांमुळे मला खूप दु:ख झाले आहे. राहुल गांधींना मी माझा भाऊ मानते. त्यामुळे बहीण म्हणून माझे कर्तव्य पार पाडत आपले घर राहुल गांधींच्या नावावर केल्याचे त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधींनी दिले होते घर : ही वसाहत राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी बांधली होती आणि त्यांना हे घर त्यामुळेच मिळाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आज त्या इंदिरा गांधींनी दिलेले घर त्यांचे नातू राहुल गांधी यांच्या नावे करत आहेत. राजकुमारी गुप्ता म्हणाल्या की, भाजपने राहुल गांधी यांना दिलेल्या वागणुकीमुळे मला अनेक रात्री झोप लागली नाही. आता जेव्हा त्यांना सरकारी घर रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे, तेव्हा त्या आपले घर राहुल गांधींच्या नावे करून बहीण म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
खासदारकी का रद्द झाली? : सुरतच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2019 मध्ये मोदी आडनावाबद्दल केलेल्या टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते? असे ते म्हणाले होते. यासाठी त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्यांची लोकसभेची खासदारकी देखील रद्द झाली आहे.