नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाकडून देशभरात राजभवन घेराव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यपाल निवासस्थानाला काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आज घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतून या आंदोलनाची सुरूवात करणार आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ऐकी दाखवण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. किसान अधिकार दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने हे आंदोलन उभारले आहे.
उपराज्यपाल निवासस्थानाला घेराव -
राजभवन आणि केंद्रशासित प्रदेशातील उपराज्यपालांच्या निवास्थानाला घेराव घालण्याचे पक्षाने राज्यातील नेतृत्त्वाला दिले आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्लीतील चांदगी राम आखाडा येथे सर्व कार्यकर्ते आणि नेते जमा होणार आहेत. तेथून उपराज्यपालांच्या निवासस्थानाकडे मोर्चा नेण्यात येणार आहे.
शेतकरी आंदोलनाला काँग्रेस पाठिंबा -
केंद्र सरकारने पास केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. दिल्लीमध्ये मागील ५० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पहिल्यापासून पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाब आणि हरयाणा राज्यात ट्रॅक्टर रॅली काढली होती. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर यावरू अनेक वेळा हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, या आठवड्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिली. या कायद्यांविरोधी याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे कायदे स्थगित करण्याचा निकाल दिला. यासोबतच, न्यायालयाने हा वाद सोडवण्यासाठी एका चार सदस्यीय समितीची घोषणाही केली होती. या चौघांपैकी एकाने या समितीमधून माघार घेतली आहे. कित्येक शेतकरी संघटनांनी या समितीसोबत चर्चा करण्यास नकार दिला आहे.