नवी दिल्ली : काँग्रेस सप्टेंबरमध्ये राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा काढण्याची योजना आखत आहे. आगामी 4 राज्यांमधील निवडणुका, तसेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला बळकटी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले जाणार आहे.
पक्षात यात्रेबाबत चर्चा सुरू : पक्षाच्या अंतर्गत सूत्रांच्या मते, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा राष्ट्रीय समन्वय समितीने गेल्या आठवड्यात काही निवडक नेत्यांसोबत राहुल गांधींच्या देशव्यापी यात्रेवर चर्चा केली. यात्रेचा भाग 2 सुरू करण्याबाबत पक्षांतर्गत एकमत असले, तरी यात्रा सुरुवात करण्याची तारीख आणि मार्ग या दोन महत्त्वाच्या बाबींवर नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 'यात्रा व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. परंतु हायकमांड या प्रकरणी अंतिम निर्णय घेईल,' असे संघटनेचे प्रभारी सचिव वामशी चंद रेड्डी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.
वेळेचा फॅक्टर महत्त्वाचा : पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, 'समन्वय पॅनेलने चर्चा केली आहे की राहुल गांधींनी पहिल्या दक्षिण-उत्तर यात्रेप्रमाणे आता पश्चिम ते पूर्व भारताची पायी यात्रा करावी'. 'पूर्ण यात्रा करायला सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. वेळेचा फॅक्टरही महत्त्वाचा आहे, कारण पक्ष नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच विधानसभा निवडणुका तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करत आहे', असे कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ पदाअधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम भारत ते पूर्व भारत यात्रा : पहिली भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू करण्यात आली होती. ती 30 जानेवारी 2023 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे संपली. यात्रेचा दुसरा भाग गुजरातमधील पोरबंदर ते त्रिपुरातील आगरतळापर्यंत नियोजित आहे. ही यात्रा पश्चिम भारतात सुरू होऊन पूर्व भारताचे टोक गाठणार आहे. गुजरात ही महात्मा गांधींची भूमी असल्याने, महात्माजींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदर येथून दुसरी भारत जोडो यात्रा सुरू केल्यास आम्हाला खूप आनंद होईल, असे गुजरात कॉंग्रेसचे नेते अमित चावडा यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. दक्षिण ते उत्तर यात्रेला प्रचंड यश मिळाले. या यात्रेने 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकणारे राहुल गांधी एकमेव राष्ट्रीय नेते आहेत हे दाखवून दिले, असेही ते म्हणाले.
15 ऑगस्टला यात्रा सुरू करावी : पक्षाच्या अंतर्गत सूत्रांच्या मते, दुसऱ्या भारत जोडो यात्रेच्या लाँचची तारीख महत्वाची आहे. पक्षातील काही लोकांना, देशव्यापी संदेश देण्यासाठी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ही यात्रा सुरू करावी असे वाटत आहे. मात्र पुढच्या महिन्यात पडणाऱ्या पाऊस हा महत्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे हवामानाच्या परिस्थितीमुळे सप्टेंबरमध्ये यात्रा सुरू करणे अधिक व्यावहारिक असेल, असे एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने सांगितले.
हेही वाचा :