नवी दिल्ली - राज्यसभेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधी पक्षांवर केला. मोदींनी टिका करताच काँग्रेस नेत्यांनी सभागृहातून वॉकआऊट केला. तसेच त्यांनी काँग्रेसचा 'कन्फ्यूजन पार्टी' असा उल्लेख केला.
काँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका असते. तर लोकसभेत दुसरी भूमिका आहे. काँग्रेस इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी पार्टी पण सर्वात संभ्रमित असलेली पार्टी काँग्रेस आहे. काँग्रेस स्वतःच्या भल्यासाठी काही करू शकत नाही. तसेच देशाचेही प्रश्न काँग्रेस सोडवू शकत नाही. यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते, अशी कडवट टीका मोदी यांनी केली.
अधिर रंजन चौधरी यांना मोदींकडून समज -
पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. तसेच काळे कायदे वापस घ्या, अशी घोषणाबाजी केली. यावेळी मोदींनी काँग्रेसेचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी यांनी समज दिली. आता फार झालं, अधीर रंजनजी आता हे योग्य नाही. मी तुमचा आदर करतो, असे प्रत्युत्तर मोदींनी चौधरींना दिले.
आंदोलनजीवीवर पुन्हा भाष्य -
राज्यसभेत भाषण करताना आंदोलनजीवी हा शब्दप्रयोग वापरल्यामुळे मोदींवर टीका झाली होती. त्यानंतर आज मोदींनी सावध पावलं टाकली. शेतकरी आंदोलनाला मी पवित्र मानतो. पवित्र आंदोलनाचा वापर करून आंदोलनजीवी शेतकऱ्यांना बदनाम करत आहेत. अशा आंदोलनजीवीपासून देशाला वाचवलं पाहिजे, असेही ते म्हणाले.