चंदीगड / नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत सुरु असलेल्या संघर्षानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्वसंमतीने नेता निवडीचे सर्व अधिकार सोनिया गांधी यांना देण्यात आले. त्यामुळे पंजाबचा नवा मुख्यमंत्री आता दिल्लीतून ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याकरिता कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता -
ताज्या माहितीनुसार काँग्रेसने आज (रविवार) पुन्हा एकाद विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. रविवारी सकाळी ही बैठक सुरु होणार असून याच बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सकाळी ११ वाजता आयोजित या बैठकीला हरिश रावत आणि अजय माकन देखील उपस्थित राहाणार आहेत.
माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचेही नाव चर्चेत -
सूत्रांच्या माहितीनुसार, विधीमंडळ पक्ष नेतेपदी सिद्धू शिवाय माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, माजी मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, तृप्त राजिंदर सिंग बाजवा आणि राज्यसभा सदस्य प्रतापसिंग बाजवा यांच्या नावाचीही चर्चा आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, ब्रम्ह मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला, पंजाब काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष कुलजीत सिंग नागरा या नावांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
सिद्धूच्या नावाला अमरिंदर सिंग यांचा विरोध -
काँग्रेस सूत्रांची माहिती आहे की, जर पक्ष श्रेष्ठींनी सिद्धू यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर हिंदू आणि दलित समाजातून एक-एक उपमुख्यमंत्री किंवा या दोन्हीपैकी एका समुदायाचा उपमुख्यमंत्री आणि दुसऱ्या समुदायाच्या नेत्याला प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद दिले जाऊ शकते. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे. सिद्धू यांचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप करत त्यांना मुख्यमंत्री केले तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याचे भाकित त्यांनी वर्तवले आहे.