नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून फरार झालेला आरोपी मेहूल चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फरार हिरे व्यापारी मेहूल चोक्सीला भारतात कधी परत आणले जाईल, याविषयी परराष्ट्र मंत्रालयाकडून आज एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या आठवड्यात मेहूल चोक्सीबाबत कोणतेही मोठे अपडेट नाही. तो सध्या डॉमिनिका अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश 15 एप्रिल रोजी ब्रिटनने दिले होते. त्याविरूद्ध अपील करण्याची मागणी त्याने केली आहे. मात्र, तो कोठडीतच आहे. त्याचे लवकरात लवकर प्रत्यार्पण केले जाईल, याची आम्ही खात्री करू, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
दरम्यान, डॉमिनिका सरकारने मेहूल चोक्सीला देशात बंदी घातलेला स्थलांतरित म्हणून घोषित केले आहे. या संदर्भात, डॉमिनिकाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गृह मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. डॉमिनिकाचे पंतप्रधानांनी चोक्सीचा भारतीय नागरिक म्हणून उल्लेख केला आहे. या फरार व्यक्तीचे काय करायचे हे न्यायालय ठरवेल, परंतु निकाल लागेपर्यंत चोक्सीच्या हक्कांचे सरकार संरक्षण करेल, असे ते म्हणाले. डॉमिनिका हायकोर्टाने 11 जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.
अँटिग्वा देशामध्ये बसला होता दडून -
सध्या कर्जबुडवा मेहूल चोक्सी डॉमिनिकाच्या ताब्यात आहे. 62 वर्षीय मेहूल चोक्सी 2018 ला भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा या देशामध्ये दडून बसला होता. मेहूल चोक्सी अँटिग्वाचा नागरिक असल्याचा दावा करत आहे. मात्र भारताने त्याचं नागरिकत्व अजून रद्द केलेलं नाही. त्यामुळे तो भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध होईल आणि त्याला भारतात आणणं सोपं होईल असे म्हटलं जात आहे. मेहूल चोक्सीला 23 मे रोजी डॉमिनिका पोलीसांनी अटक केली होती. तर डॉमिनिकामधून भारताकडे न सोपवता अँटिग्वामध्ये परत जाता यावे, यासाठी चोक्सी जोरदार प्रयत्न करत आहे.
चोक्सीकडून पीएनबीला 13,500 कोटींचा गंडा -
चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआय त्याच्या विरोधात चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहूल चोक्सीची 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीनेही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता. सध्या तो युनायटेड किंग्डममध्ये आहे. पुतण्याच्या आधी काका चोक्सीला भारतात आणण्यात येईल असे दिसते. नीरव मोदीचे या प्रत्यार्पण झाल्यानंतर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेल राहणार आहे. याच सेलमध्ये चोक्सीला ठेवण्याची शक्यता आहे.