लखनौ - खासगी रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे भासवून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने कोरोना लस घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर लस घेतल्याचा पराक्रम त्याने फेसबुकवरही पोस्ट केला. मात्र, थोड्याच वेळात ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. आता आरोग्य विभागाने या महाभागाचा शोध सुरू केला आहे.
लसीचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर टाकले -
केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फक्त पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांनाच लस देण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यात येत नसतानाही या व्यक्तीने आरोग्य कर्मचारी असल्याचे खोटे सांगून लस घेतली. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे भासवून त्याने लस घेतली. या लसीचे सर्टिफिकेटही त्याने मिळवले. तसेच सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र, काही वेळातच ही माहिती सगळीकडे पसरली.
आरोग्य विभागाकडून शोध सुरू -
या 'फेक' लसीकरण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी अमिता अगरवाल यांनी दिली. कोरोना लसीकरण फक्त पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे होत आहे. तसेच लसीकरणाची सर्व माहिती कोविन अॅपमध्ये साठवण्यात येत आहे. या बनावट लसीकरण घटनेमुळे व्यवस्थापनातील सावळा गोंधळ उघड झाला आहे. कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. या व्यक्तीने खोटी माहिती सांगून फक्त पहिला डोस घेतल्याने त्याच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.