मुंबई - भाजप शिवसेनेने युती करुन निवडणूक लढवली होती. त्यामुळे लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले आहे. आम्हीच खरी शिवसेना असून लवकरच त्याबाबत न्यायालयाकडून खुलासा होईल, असे एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत ठणकावले. मेट्रो आणि समृद्धी हे प्रकल्प लवकर पूर्ण करू, असेही यावेळी त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे हे आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्यासोबत होते.
मुंबई तोडायची म्हणून शिवसेना तोडली - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबई तोडण्यावरुन जोरदार हल्लाबोल केला. मुंबई तोडायची म्हणून शिवसेना तोडली अशी टीका संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला. मुंबई कधीही कोणी तोडू शकत नाही. जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्याकडे आता कोणतेच मुद्दे राहिले नाहीत, त्यामुळे असे वाद उकरुन काढावे लागतात असेही शिंदे म्हणाले.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको - निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतरच निवडणुका घेण्यात याव्यात ही आमची भूमीका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याबाबत निवडणूक आयोगाकडेही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतरच निवडणुका घेण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
50 खोके कसले, मिठाईचे का ? - संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर आज नाशिकमध्ये हल्लाबोल केला. बंडखोर आमदारांना 50 खोके मिळाल्यामुळेच शिवसेनेत बंड केल्याची टीका केली होती. त्यावर माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, कसले खोके? मिठाईचे का, असा मिश्कील सवाल करत त्यांनी संजय राऊत यांच्या आरोपाची खिल्ली उडवली.
राज्यातील घडामोडीची जगभरात नोंद - राज्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या जगभरात पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्यावर आता काही बोलणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे विधायक कामे सांगावीत ती राज्य सरकार करेल असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दाऊदने केलेल्या बॉम्बस्फोटाविरोधात बोलू शकत नव्हतो - सभागृहात बोलताना आम्हाला सावरकरांविषयी आम्हाला बोलता येत नव्हते. मुंबईत हजारो नागरिकांचा बळी घेणाऱ्या दाऊदच्या विरोधातही आम्हाला बोलता येत नव्हते असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आषाढीनंतर होणार मंत्रीमंडळाचा विस्तार - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अनेक दिवस झाले. मात्र तरीही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, त्यांनी आषाढीनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली.