बंगळुरू - उत्तराखंडनंतर आता कर्नाटकात नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच यावर पहिल्यांदा येडीयुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. येडीयुरप्पा यांनी जर राजीनामा दिला, तर राज्याची कमान कोणाच्या हाती सोपविली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कर्नाटकातील भाजपा सरकारला 26 जुलैला दोन वर्ष पूर्ण होतील. त्यानंतर हाय कमांड जो निर्णय घेईल, त्याचे अनुसरण करणार असल्याचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी म्हटलं. यापूर्वीही येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा उडल्या होत्या. तेव्हा येडीयुरप्पा यांनी सर्व अफवांचे खंडन केले होते. मात्र, आता यावेळी तसे झाले नाही.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पक्षाने आतापर्यंत 75 पेक्षा जास्त वय असलेल्या कोणालाच पद दिले नाही. मात्र, माझ्या कामामुळे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि जे. पी नड्डा यांनी वय न पाहता जबाबदारी दिली. उद्या कर्नाटकाचा मुख्यमंत्री म्हणून मला दोन वर्ष पूर्ण होतील. पक्षाला दृढ करणे आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीत सत्तेत आणणे हेच माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
कर्नाटकात भाजपाला 2 वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर सरकारचा एक खास कार्यक्रम आहे. कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर पक्षाध्यक्षांनी दिलेल्या सूचनांचे मी पालन करीन, असेही ते म्हणाले. तसेच आतापर्यंत समर्थन करत आल्याबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
येडीयुरप्पांवर आमदार नाराज -
येडीयुरप्पासंदर्भात राज्यातील भाजपामध्ये नाराजीचे वातावरण होते. थेट मुख्यमंत्री बदलण्याची मागणी एका गटाने केली काही दिवसांपूर्वीच केली होती. आगामी विधानसभा निवडणूक बी.एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात लढता येणार नाही. म्हणून मुख्यमंत्री 100 टक्के बदलला पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदाराच्या एका गटाने केली. तेव्हापासून येडीयुरप्पा यांची उचलबांगडी करण्यात येणार, अशी चर्चा सुरू होती.
काँग्रेस-जेडीएस सरकार पाडून येडीयुरप्पा सत्तेत -
कर्नाटकात 2018 ला विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि राज्यात काँग्रेस-जेडीएस सरकार स्थापन झाले. मात्र, 2019 च्या जुलैमध्ये काँग्रेसच्या 17 आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणीत अपयशी काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले आणि येडीयुरप्पा सत्तेत आले होते.