देवघर - मंगळवारी ( 12 जुलै ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी झारखंडमधील देवघर विमानतळाचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्याला झारखंडचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ( Jyotiraditya Scindia ), केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, माजी मुख्यमंत्री रघुवर दास आणि खासदार निशिकांत दुबे यांच्यासह अनेक खासदार आणि आमदार उपस्थित होते.
सध्या देवघर ते कोलकाता येथे इंडिगोचे विमान उड्डाण करत आहे. येत्या काही दिवसांत आणखी अनेक शहरे देवघरशी जोडली जाणार आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, देवघर विमानतळाचा सुमारे 2.5 कोटी लोकांना फायदा होणार आहे. सध्या या विमानतळाची क्षमता ५ लाख आहे. बोईंग विमाने आणि एअरबस या दोन्ही विमानांना येथे उतरण्याची सोय आहे. तसेच, देवघर येथून 14 नवीन मार्ग सुरू होतील. बोकारो, जमशेदपूर आणि दुमका ही विमानतळेही कार्यान्वित होतील. झारखंडमध्ये दररोज साडेसात हजार प्रवासी असतील. दररोज 56 विमाने झारखंड, देवघर ते रांची, देवघर ते पाटणा आणि देवघर ते दिल्ली प्रवास करतील.
दरम्यान, देवघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 18500 कोटींच्या एकूण 26 प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. चारशे एक कोटी खर्चून बांधलेले देवघर विमानतळ, पंतप्रधानांनी देवघरमधील नागरिकांना समर्पित केला.