रायपूर : ट्रकने बोलेरोला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात तब्बल 11 प्रवासी ठार झाले आहेत. ही घटना धमतरी जिल्ह्यातील रुद्री परिसरातील सोराम गावात बुधवारी रात्री घडली. हे सगळे नागरिक सोराम भाटगाव येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी होती. तिला रायपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढून 11 झाली आहे.
लग्नाला गेले होते कुटूंब : सोराम गावातील साहू कुटुंब कांकेर येथील चरमा मरकटोला येथे लग्नाच्या कार्यक्रमाला जात होते. बुधवारी रात्री बालोदच्या दिशेना जाताना समोरून येणाऱ्या ट्रकने बोलेरोला धडक दिली. त्यामुळे बोलेरोचा चक्काचूर झाला. बोलेरोमधील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी या कुटुंबातील एक मुलगी गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक : बालोद येथील अपघातात दहा नागरिक ठार झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या अपघातात जखमी झालेल्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री भूपेश यांनी रात्री उशिरा याबाबत ट्विट केले आहे. यात त्यांनी बालोदमधील पुरूर आणि चरमा दरम्यान बालोदगहानजवळ लग्न समारंभासाठी जाणाऱ्या बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य देवो असे ट्विट केले आहे. या घटनेतील ट्रक चालकाचा बालोद पोलीस शोध घेत असल्याची माहिती बालोदचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली आहे.
हेही वाचा - Shirdi Murder : शिर्डीच्या कालिकानगर परिसरातील मयेश्वर कॉलनीत भावानेच केली बहीणीची हत्या