नवादा(बिहार) - अभिनेता सोनू सूदने(Famous Actor Sonu Sood) पुन्हा एकदा बिहारच्या मुलीला मदत केली आहे. त्याच्या मदतीने चार पाय व चार हात असलेल्या चौमुखीवर (Child with 4 Hand 4 Leg in Nawada) मुंबईत उपचार सुरू होणार आहेत. ती मुलगी आपल्या कुटुंबासह मुंबईत पोहोचली आहे. तिथे पोहोचल्यावर सोनू सूदने स्वतः तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. चौमुखीच्या आयुष्यात लवकरच नवीन आनंद येणार असल्याचे सोनूने सांगितले. बिहारच्या वारिसालीगंजच्या नवाडा येथील हेमडा गावातील बसंत पासवान यांच्या मुलीला जन्मापासून चार हात आणि चार पाय आहेत. गरिबीमुळे बसंतला आपल्या मुलीवर योग्य उपचार करता आले नाहीत.
चौमुखीवर मुंबईत होणार उपचार - मुलीच्या प्रकृतीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यानंतर अभिनेता सोनू सूदने मदतीचे आश्वासन दिले होते. त्याने कुटुंबियांशी संपर्क साधला. सोनू सूदने चौमुखीच्या शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईत बोलावले होते. त्यानंतर लगेच चौमुखी, तिचे पालक आणि पंचायत प्रमुखांसह मुंबईत पोहोचली आहे. येथे कुटुंबीयांनी अभिनेता सोनू सूदची भेट घेतली.
सुरुवातीला या मुलीला पटनामधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ही क्रिटिकल केस असून यावर येथे उपचार होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर सोनू सूदने आमच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला व मुंबईत या, तिच्यावर येथे उपचार करू असे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही लगेच मुंबईत दाखल झालो, अशी माहिती पंचायत प्रमुख दिलीप रावत यांनी दिली.
सोनू सूद आमच्यासाठी देव - सोनू सूद यांनी आमच्या मुलीसाठी मदत केली. तिला नवीन जीवन देत तिच्या आयुष्यात आनंद आणला आहे. त्यामुळे सोनू सूद आमच्यासाठी देवच असल्याची प्रतिक्रिया चौमुखीच्या आईवडिलांनी दिली आहे. चौमुखीच्या कुटुंबात पाच सदस्य असून, त्यातील चार सदस्य दिव्यांग आहेत. मोलमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवते.