जोहान्सबर्ग : चंद्रयान 3 विक्रम लँडरचं आज सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग होणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक चंद्रयान 3 मोहिमेचं सॉफ्ट लँडींग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्चुअली या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO ) आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग करुन इतिहास रचणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत : चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडींग आज सायंकाळी होणार असल्यानं देशभरात मोठा उत्साह आहे. मात्र हा उत्साह पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते ग्रिसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्चुअली उपस्थित राहून चंद्रयान 3 लँडरचं लँडींग पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यासाठी व्हर्चुअली उपस्थित राहण्याची व्यवस्था दक्षिण आफ्रिकेत करण्यात आली आहे.
जगभरात चंद्रयान 3 यशस्वी होण्यासाठी होम हवन : पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून चंद्रयान 3 मोहिमेचे साक्षीदार होणार आहेत. तर दुसरीकडं जगभरातील भारतीय वंशाच्या नागरिकांनी होम हवन आणि पूजा अर्चा करुन चंद्रयान 3 यशस्वी होण्याची प्रार्थना करत आहेत. चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरचं सायंकाळी 06.04 वाजता सॉफ्ट लँडींग होणार आहे. लंडनमधील उक्सब्रिज येथील भारतीय वंशांच्या विद्यार्थी आणि संशोधकांनी आद्यशक्ती माताजी मंदिरात विशेष प्रार्थनेचं आयोजन केलं होतं. तर दुसरीकडं अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनीही चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
देशातील विविध ठिकाणी पूजा : चांद्रयान 3 लँडरच्या यशस्वी लँडिंगसाठी देशभरात प्रार्थना आणि पूजा अर्चा करण्यात येत आहे. ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन घाटावरही गंगा आरती करण्यात आली आहे. त्यासह भुवनेश्वर, वाराणसी, वडोदरा आदीसह जगभरात होम हवन आणि पूजा अर्चा जोरात करण्यात येत आहे. दुसरीकडं लखनऊमधील इस्लामीक सेंटर ऑफ इंडियामध्ये नागरिकांनी चंद्रयान 3 लँडरच्या यशस्वी लँडींगसाठी नमाज अदा केली आहे.
हेही वाचा -