इटानगर - सरसेनाध्यक्ष बिपीन रावत अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अरुणाचल प्रदेश सीमेवरील फार्वर्ड चौक्यांना भेट दिली. सीमेवरील सुबनसारी खोऱ्यातील चौक्यांची पाहणी करून इंडो तिबेटीयन बार्डर पोलिसांशी संवाद साधला. सीमेवर बारीक नरज ठेवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यावरून रावत यांनी जवानांचे कौतुक केले.
जवांनाचे केले कौतुक
लष्कराची तयारी आणि जवानांचे मनोधैर्य पाहून रावत यांनी जवानांचे कौतुक केले. तसेच संरक्षण सिद्धतेवरून समाधान व्यक्त केले. जर कोणी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सर्वनाश निश्चित्त असल्याचे रावत म्हणाले. अरुणाचल प्रदेशबरोबरच आसाम राज्यातील सीमा भागाचाही त्यांनी दौरा केला. भारतीय जवानांचे उच्च मनोबल पाहून शत्रुंचा सर्वनाश होईल याचा मला विश्वास आहे, असे रावत म्हणाले.
चीनसोबच्या सीमावादानंतर जवान हाय अलर्टवर -
भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून लष्कर प्रमुख आणि सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी लडाख सीमेवर भेटी दिल्या आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सीमाभागाचा दौरा करून तयारीचा आढावा घेतला. तसेच लष्कराचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये मागील १० महिन्यांपासून वाद सुरू आहे. अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे चीनसोबतच्या संपूर्ण सीमेवर भारतीय लष्कर सतर्क आहे.