लुधियाना : पंजाबमधील लुधियानामध्ये मोठा दरोडा टाकण्यात आला आहे. येथील राजगुरू नगरच्या सीएमएस कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरटे तेथे उभी असलेली कॅश व्हॅन घेऊन पळाले. त्यांनी अंदाजे 7 ते 10 कोटी रुपयांचा ऐवज लुटला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही कॅश व्हॅन मुल्लापूरजवळ जप्त केली आहे.
शस्त्रे दाखवून लुटले : मिळालेल्या माहितीनुसार, सीएमएस कंपनीकडून एटीएममध्ये रोख रक्कम जमा केली जाते. या केंद्रात डझनभर कॅश व्हॅन उभ्या असतात, ज्या वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी जातात. या केंद्रात 24 तास सुरक्षा कर्मचारीही उपस्थित असतात. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास काही चोरटे कॅश व्हॅन सेंटरमध्ये आले. त्यांनी सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना शस्त्रे दाखवून एका खोलीत कोंडून हा दरोडा टाकला.
चोरी केलेली व्हॅन सापडली : या प्रकरणी लुधियानाच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले की, लुटलेल्या पैशांचे मूल्यांकन सुरू आहे. सुमारे 7 ते 10 कोटी रुपयांची लूट झाल्याचा संशय आहे. या घटनेची लवकरच उकल करू. आम्हाला घटनेचे अनेक क्लूस मिळाले आहेत, जे सध्या मीडियासोबत शेअर करता येणार नाहीत, असे ते म्हणाले. प्राथमिक तपासादरम्यान मुल्लानपूरजवळ एक व्हॅन सापडली असून, त्यात दोन शस्त्रेही सापडली आहेत. पोलिस आयुक्तांनी याला कंपनीचा निष्काळजीपणा म्हटले आहे. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत, कारण मुख्य कार्यालयात अशा प्रकारे पैसे लुटण्याची ही मोठी घटना आहे.
दरोडेखोरांमध्ये महिलेचाही समावेश : ही घटना घडवून आणणाऱ्या दरोडेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. याला कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, आरोपींकडे शस्त्रे होती, पण त्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. त्यांनी फक्त कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावले आणि एका खोलीत बंद केले. सकाळी सातच्या सुमारास नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती देण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. रात्री उशिरा दीड वाजता ही घटना घडली.
हेही वाचा :