नवी दिल्ली : देशाच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारी घटना देशाची राजधानी दिल्लीत समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिल्लीतील काही मुले जपानी मुलीला जबरदस्तीने रंग लावताना दिसत आहेत. तर मुलगी सतत विरोध करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना चौकशीसाठी अटक केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल झालेली नाही. जपानी दूतावास किंवा तरुणीच्या वतीने तक्रार दिल्यास आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मुलगी जपानची : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी जपानची असून; ती काही कामासाठी नवी दिल्ली परिसरात जात होती, तेव्हा काही मुलांनी तिला ओढले आणि जबरदस्तीने रंग लावण्यास सुरुवात केली. मुलांपासून वाचण्यासाठी मुलगी सतत ओरडत होती. एका मुलाने मुलीच्या डोक्यावर अंडी फोडली. दुसरीकडे, दोन-तीन मुलांनी तिला जबरदस्तीने पकडून रंग लावला. मुलगी त्यांच्यापासून पळू लागली. दरम्यान, एक मुलगा तिच्या तोंडाजवळ आला आणि हॅप्पी होली म्हणाला, त्यावर मुलीने त्याला धापड मारली. मात्र, यावेळी दोन मुले मुलीचा बचाव करताना दिसली.
तक्रार आल्यास आरोपींवर कडक कारवाई : मध्य जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, व्हिडिओच्या आधारे एका अल्पवयीन मुलासह एकूण तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जपानी दूतावासाशीही संपर्क करण्यात आला आहे. या तरुणीने अद्याप जपानी दूतावास किंवा कोठेही तक्रार केलेली नाही. तरुणीशी संपर्क साधण्याचेही प्रयत्न सुरू असून; तक्रार आल्यास आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. याशिवाय महिला आयोग किंवा अन्य कोणत्याही संस्थेच्या वतीने तक्रार आल्यास आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल : एका कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, तुम्ही काहीही करा, रस्त्यावर महिला सुरक्षित नाहीत. ते म्हणाले की, आपल्याला महिलांना केवळ सुरक्षितता द्यायची नसून; त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करायची आहे. जोपर्यंत रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्व उपाय-योजनांचे काहीच औचित्य नाही. त्यासाठी सरकारलाच नाही, तर सर्वसामान्यांनाही स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागणार आहे.