नवी दिल्ली : दिल्लीतून पुन्हा एकदा प्रेमाचा रक्तरंजित अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण दिल्लीतील करावल नगर भागातील आहे. येथे एका तरुणावर लग्नाच्या दबावामुळे आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याचा आरोप आहे.
गळा दाबून खून केला : ईशान्य दिल्लीचे डीसीपी डॉ. जॉय तिर्की यांनी सांगितले की, 12 एप्रिलच्या रात्री कृष्णा पब्लिक स्कूलजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याचा फोन करवल नगर पोलिस स्टेशनला आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अंदाजे 25 वर्षीय महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या शरीरावर कोणतीही स्पष्ट जखम दिसत नव्हती. मृतदेह जीटीबी रुग्णालयात नेण्यात आला. तेथेही डॉक्टरांना शरीरावर कोणतीही स्पष्ट जखम आढळली नाही. रोहिना नाज उर्फ माही असे मृत महिलेचे नाव आहे. 15 एप्रिल रोजी जीटीबी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सीसीटीव्हीने आरोपीची ओळख : यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, ज्यामध्ये मोटारसायकलवरील दोन लोक संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्या दोघांच्या मध्ये एक महिला बसली होती. कॅमेऱ्यांचे रिझोल्यूशन खराब असल्याने मोटरसायकलचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यासाठी 4 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या पथकांनी मोटारसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांचा सुमारे 12-13 किलोमीटर अंतरापर्यंत मजला बाजार तेलीवाडा परिसरात शोध घेतला. शेवटी 20 एप्रिल रोजी, पोलिस पथकांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यामध्ये एक पट्टेदार टी-शर्ट घातलेला माणूस मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहे आणि एक महिला त्याच्या मागे चालत आहे, असे दिसले. सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या दोघांची ओळख विनीत आणि त्याची बहीण पारुल अशी झाली आहे.
आरोपी महिलेला अटक : पोलीस या दोघांना अटक करण्यासाठी गेले असता त्यांच्या घराला कुलूप आढळून आले. विनीत गेल्या काही दिवसांपासून दिसत नव्हता तर पारुलने 20 एप्रिललाच घर सोडल्याचे कळाले. तिने आपले सामान आणि दोन मुलांसह शिफ्ट करण्यासाठी घोड्याचा टांगा वापरला होता. विनीतचे गाव बागपतमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि एक टीम तात्काळ बागपतला रवाना झाली. त्याचवेळी पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या घोड्याच्या टांग्याचा माग काढला आणि घोड्याचा मालकाला पकडले. चौकशीदरम्यान त्याने पारुलला ज्या घरात सोडले होते, त्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पारुलला कृष्णा नगर येथील घरातून अटक केली.
विनीत यापूर्वीही खून प्रकरणात दोषी : चौकशीदरम्यान पारुलने भाऊ विनीतसह रोहिना नाज उर्फ माही हिच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. तिने सांगितले की, विनीत आणि रोहिना नाज 4 वर्षांपूर्वी घरातून पळून गेले होते. ते एकत्र राहत होते पण त्यांचे लग्न झाले नव्हते. पारुलने सांगितले की, 2017 मध्ये विनीत आणि त्याच्या वडिलांना एका खुनाच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विनीत तुरुंगात असताना रोहिना नाज तिची बहीण पारुल चौधरीसोबत दिल्लीत राहत होती.
हत्येपूर्वी विकण्याची योजना होती : विनीत गेल्या वर्षीच जामिनावर बाहेर आला होता. तेव्हापासून रोहिना त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. रोहिना वेगळ्या समाजाची असल्याने विनीतचे कुटुंबीय लग्नाला विरोध करत होते. वारंवार होणाऱ्या भांडणामुळे विनीत आणि त्याची बहीण पारुल यांनी तिला विकण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार रोहिनाच्या लक्षात येताच तिने भांडण सुरू केले. यानंतर विनीत आणि पारुलने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. 12 एप्रिल रोजी रोहिना आणि विनीतमध्ये विवाहाच्या मुद्द्यावरून भांडण झाले, त्यादरम्यान विनीतने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर विनीतने त्याच्या एका साथीदारासह मृतदेह मोटरसायकलच्या मध्यभागी ठेवला आणि 12 किलोमीटरहून अधिक काळ तो फेकण्यासाठी जागा शोधत राहिला. अखेर त्यांनी करवल नगर येथील घराबाहेर मृतदेह टाकून पळ काढला.
आरोपी विनीत अद्याप फरार : यानंतर विनीत काकरीपूर, बागपत येथील आपल्या गावी निघून गेला. सध्या विनीत आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्ह्याच्या घटनास्थळाचा गुन्हे पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांकडून तपास केला जाईल. पारुलला आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : Man Murder Wife : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून; पोलिसांनी आवळल्या पतीच्या मुसक्या