जगगय्यापेटा (आंध्र प्रदेश) : मुंबईत अपहरण झालेला एक मुलगा आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातल्या जगगय्यापेटा गावात तब्बल वर्षभरानंतर सापडला आहे. जगगय्यापेटा येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाला रविवारी महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विजयवाडा येथील महिलेने विकले : एसआय रामाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबईत एक मुलगा गायब झाला होता. महाराष्ट्र पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला असता विजयवाडा येथील एका महिलेने त्या मुलाला मुंबईतून नेल्याचे आढळून आले. महिलेने मुलाला जगगय्यापेटा येथील एका महिलेला 2 लाख रुपयांना विकले. तिथे त्या महिलेने त्याला तिच्या नातेवाईकांना 3 लाख रुपयांना दिले. तेव्हापासून त्याच कुटुंबात वाढणाऱ्या या मुलाने जगगय्यापेटा येथील एका खासगी शाळेत प्रवेश घेतला.
मुलगा महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात : शहरातील मार्केट यार्डात रविवारी शाळेचा वर्धापनदिन सुरू असताना, महाराष्ट्र पोलीस जगगय्यापेटा पोलिसांसह आले आणि त्यांनी संबंधित पुरावे आणि केसची कागदपत्रे दाखवून मुलाला घेऊन गेले. वर्षभरापासून संगोपन करणाऱ्या या मुलाला पोलिसांनी अचानक नेले. तेव्हा कुटुंबीयांना रडू कोसळले. हा विषय आता स्थानिकांमध्ये चर्चेचा बनला आहे. या प्रकरणी अपहरण करणारी विजयवाडा येथील महिला आणि मध्यस्थी म्हणून काम करणाऱ्या जगगय्यापेटा येथील आणखी एका महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. मुलाला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती, कागदपत्रे आणि तपशील पुरवला जात आहे, असे पोलीस निरीक्षक रामाराव म्हणाले.
मुंबईतून ई-सिगारेटचा साठा जप्त : गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने मुंबईतून प्रतिबंधीत ई-सिगारेटचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मुंबईच्या डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मस्जिद बंदर परिसरातून एका 33 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या सोबतच पोलिसांनी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ई सिगारेट्सचे 10 बॉक्स आणि एक इनोव्हा कार देखील जप्त केली आहे. या एकूण जप्त मालमत्तेची किंमत अंदाजे 81 लाख रुपये आहे. यामध्ये 66 लाखांच्या ई सिगारेट्सचा समावेश आहे.
हेही वाचा : Mumbai Crime News: सायबर क्राईमचा वाढता विळखा, बनावट लिंकवर क्लिकद्वारे 3 दिवसांत 40 जणांची फसवणूक