नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार राजीव प्रताप रुडी यांना बिहारमध्ये झेड प्रवर्गाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफला दिली आहे. झेड सुरक्षा ही दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी मानली जाते. महत्त्वाच्या किंवा अति महत्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाने राजीव प्रताप रुडी यांना झेड-वर्ग सुरक्षा पुरविली आहे. सीआरपीएफचे जवान त्यांच्या संरक्षणाखाली तैनात असतील. महत्त्वाचे म्हणजे राजीव प्रताप रुडी हे चारदा लोकसभा सदस्य होते. तर एकदा राज्यसभा आणि एकदा विधानसभा सदस्यही राहिले आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी अटल आणि नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
झेड प्रकारची सुरक्षा -
भारतात काही विशिष्ट व्यक्तींना पोलीस किंवा स्थानिक प्रशासनातर्फे Z+, Z, Y आणि X सुरक्षा प्रदान केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या जिवाला धोका आहे किंवा नाही, याचा आढावा सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात येतो, त्यानंतरच हा निर्णय घेतला जातो. झेड प्लस ही पहिली तर झेड ही दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा आहे. यात 22 सिक्युरिटी कर्मचारी असतात. 4 ते 5 NSG कमांडो आणि बाकी पोलीस दलातील व्यक्ती असतात. झेड सिक्युरिटी दिल्ली पोलीस अथवा CRPF द्वारे पुरवली जाते. यात एक संरक्षक कारचा देखील समावेश असतो. ही सुरक्षा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये योगा गुरू रामदेव आणि सिने अभिनेता आमिर खान अशा व्यक्ती सामील आहेत.