बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक साबण आणि डिटर्जंट फॅक्टरी (KSDL) ला रसायनांचा पुरवठा करण्यासाठी निविदा देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रशांत मदल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अटक केली. प्रशांत मदल हा चेन्नागिरीचे भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा आहे.
घरातून 6 कोटी रुपये जप्त : मदल याला लोकायुक्त पोलिसांनी क्रिसेंट रोडवरील त्याच्या कार्यालयात निविदा इच्छूकांकडून 80 लाख रुपयांची मागणी करताना आणि 40 लाख रुपये स्वीकारताना अटक केली. तपास यंत्रणांनी त्याच्या घराची झडती घेतली असून घरातून 6 कोटी रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी अधिकारी आज पहाटे चार वाजेपर्यंत कारवाई करत होते. पोलिसांनी प्रशांत मदल, त्याचा नातेवाईक सिद्धेश, अकाउंटंट सुरेंद्र, निकोलस आणि गंगाधर यांना अटक केली आहे. लोकायुक्त आयजीपी ए सुब्रमण्यश्वर राव यांनीही प्रशांतच्या कार्यालयाला भेट दिली आहे.
80 लाख रुपयांची लाच मागितली : प्रशांत काल 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडला. लोकायुक्त पोलिसांनी त्याला अटक केली असून कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू आहे. कर्नाटकात साबण आणि डिटर्जंटच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासंदर्भातील टेंडरसाठी प्रशांतने 80 लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई केली आहे. लोकायुक्त पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे.
यापूर्वी देखील घोटाळ्याचे आरोप झाले आहेत : यापूर्वी, प्रशांत मदल 2017 च्या कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (KIRDL) च्या 55 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी देखील आरोपी होता. त्यावेळी या प्रकरणी राज्य सरकारने प्रशांतसह तिघांना निलंबित केले होते. नंतर हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी सुरतकल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती.