जबलपूर (मध्य प्रदेश) : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस व माजी आमदार पंकजा मुंडे यांनी लव्ह जिहादवर आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, 'जर दोन व्यक्तींचे एकमेकांवर खरे प्रेम असेल तर त्या प्रेमात अडथळा आणायला नको. मात्र त्यात काही गडबड असेल तर ते चुकीचे असून ते थांबवलेच पाहिजे.'
'लव्ह जिहादला निवडणुकीत मुद्दा बनवणार नाही' : पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, लव्ह जिहाद हा विषय मोदी सरकारच्या अजेंड्यावर कधीच नव्हता. पक्ष याला निवडणुकीत मुद्दा बनवणार नाही. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष 30 मे ते 30 जून या कालावधीत विशेष जनसंपर्क अभियान राबवत आहे. या अंतर्गत पक्षाचे वरिष्ठ नेते जनतेशी संवाद साधत आहेत. आज पंकजा मुंडे आणि उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचे खासदार भोला सिंह जबलपूरला पोहोचले होते.
'भारतातील गरिबांची स्थिती सुधारली' : मोदी सरकारच्या कामांबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, भारताची ओळख आता जगात महासत्ता म्हणून होत आहे. पूर्वी भारतात धोरणात्मक लकवा होता, पण आता भारताची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना अशा अनेक मोठ्या योजना आहेत, ज्यामुळे भारतातील गरिबांची स्थिती सुधारली आहे. तसेच मोदी सरकार आपल्या कार्यकाळात कलम 370, ट्रिपल तलाक आणि राम मंदिराचा मुद्दा आपले कर्तृत्व मानून जनतेसमोर मांडत आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, लाडली बहना योजना ही मध्य प्रदेशची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे.
'मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही' : पंकजा मुंडे यांना यावेळी विचारण्यात आले की त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत सामील आहेत का, तेव्हा त्यांनी याला स्पष्टपणे नाकारले. त्या म्हणाल्या की, त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या वडिलांचा पक्ष आहे. त्यांना जिथे संधी मिळेल तिथे त्या काम करतील.
हेही वाचा :