बंगळुरू - कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पदडा पडला असून मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण ‘स्वेच्छेने’ हे पद सोडल्याचे त्यांनी सांगितले. तर बसवराज बोम्मई हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. बी. एस. येडियुरप्पा यांची कर्नाटकात भाजपाचा मोठा चेहरा म्हणून ओळख होती. येडियुरप्पा यांनीच दक्षिण भारतात भाजपासाठीचे दरवाजे उघडे केले होते. तर भाजपानेही मागे न राहता येडियुरप्पा यांच्यासाठी आपले नियम तोडले होते.
75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना तिकीट द्यायचं नाही, असा भाजपाचा नियम आहे. लालकृष्ण अडवानी यांना वयाचे कारण देऊनच बाजूला करण्यात आल्याचे बोलले जाते. 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना मंत्रीपद देऊ नये, असा भाजपचा निर्णय होता. वयोवृद्ध नेत्यांनी बाजूला होत नव्या लोकांना संधी द्यावी, असं संघाच्याही नेत्यांच मत होतं. मात्र, बी. एस. येडियुरप्पा यांच्या बाबतीत भाजपाने हा नियम बाजूला सारला आणि बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं.
संघाच्या शाखेतून विचारांची जडण-घडण -
येडियुरप्पांनी महाविद्यालयानी जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. 1970 साली त्यांनी एका योजनेत अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यांनी अध्यक्षपदाचे काम व्यवस्थितरित्या पार पाडले. यानंतर, त्यांनी शिकारीपूरा शहरातून नगरपालिकेची निवडणूक लढवली. ही निवडणूक त्यांनी जिंकली. येडियुरप्पांनी शिकारीपूराचे जनसंघ अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. 1980 साली त्यांना शिकारीपुराचे भाजपा अध्यक्ष बनवण्यात आले होते. 1985 साली शिमोगाचे तर, 1988 साली येडियुरप्पा कर्नाटकचे भाजपा अध्यक्ष बनले. 1994 आणि 2004 साली राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर येडियुरप्पांना विरोधी पक्षनेता म्हणून निवडण्यात आले होते.
येडियुरप्पांचे सातच दिवस टिकले मुख्यमंत्रीपद -
झाले असे होते की, 2004 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे येडियुरप्पांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. ते विरोधीपक्ष नेते पदी होते. मात्र, त्यांनी 2006 मध्ये देवेगौडा यांचा मुलगा कुमारस्वामी बरोबर हातमिळवणी केली आणि सरकार पाडलं. दोघांनी मुख्यमंत्री पद वाटून घेतले. पहिल्यांदा कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. तर फॉर्म्युलानुसार 2007 मध्ये येडियुरप्पा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पण सातच दिवस त्यांचे मुख्यमंत्रीपद टिकले. कारण, कुमारस्वामी यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत आघाडी मोडली. त्यानंतर झालेल्या 2008 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आणि येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते दक्षिण भारतातले भाजपाचे पहिलेच मुख्यमंत्री होते.
नव्या पक्षाची स्थापना -
खाणकाम घोटाळ्यात अडकल्यानंतर 31 जुलै 2011 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे भाजपा नेतृत्वार ते नाराज झाले. पक्षाला रामराम ठोकत त्यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. 2013 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला त्यांनी जोरदार झटका दिला आणि मते विभागली गेली आणि काँग्रेस सत्तेत आले.
काँग्रेस - जेडीएस पाडून भाजपा सत्तेत -
2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपला पक्ष पुन्हा भाजपात विलिन केले. तर 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून येडियुरप्पा यांची घोषणा केली. मात्र, त्रिशंकु विधानसभेत काँग्रेस - जेडीएसनं हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. मात्र, 2019 च्या जुलैमध्ये काँग्रेसच्या 17 आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणीत अपयशी काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले आणि येडीयुरप्पा सत्तेत आले होते. मात्र, दोनवर्ष पूर्ण होताच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.