भोपाळ Bhopal Unique library : मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमधल्या झोपडपट्टीतील एका अनोख्या लायब्ररीची चर्चा सर्वत्र होते आहे. या लायब्ररीनं इथल्या मुलांना वाचनाचं व्यसन लावलं. विशेष म्हणजे, ही लायब्ररी भंगाराचं साहित्य वापरून बनवण्यात आली आहे! या लायब्ररीला 'किताबी मस्ती' असं नाव देण्यात आलं असून, येथे सुमारे ३००० पुस्तकं आहेत. येथे दररोज सायंकाळी मोठ्या संख्येनं मुलं पुस्तकं वाचण्यासाठी येतात.
७ वर्षांपूर्वी वाचनालय सुरू केलं होतं : झोपडपट्टीत राहणाऱ्या मुस्कान अहिरवार या इयत्ता ११ वीच्या विद्यार्थिनीनं सुमारे ७ वर्षांपूर्वी हे वाचनालय सुरू केलं. तिला कुठेही पुस्तकं मिळाली, की ती ते घराबाहेरच्या अरुंद गल्लीत दोरीवर टांगायची. तिथे मुलं यायची. कुणी पुस्तकं वाचायचं, तर कुणी त्यातली चित्रं बघून खूष व्हायचं. मुस्कान या मुलांना पुस्तकं वाचून दाखवत असे. हळुहळु हे पुस्तकांचं जग वाढत गेलं आणि तिच्याकडे येणाऱ्या मुलांची संख्याही वाढत गेली. मुस्कान सांगते की, वस्तीजवळ एक प्लॅटफॉर्म होता. तो गणेश उत्सव आणि दुर्गा उत्सवासाठी बांधण्यात आला होता. त्याच्या आजूबाजूला पत्र्याची शेड होती. त्या शेडला दोरी बांधून मी त्यावर पुस्तकं लटकवायला सुरुवात केली. अशा प्रकारे ही मुलांची छोटी लायब्ररी सुरू झाली.
भंगारातील वस्तूंचा वापर करून लायब्ररी बनवली : काही दिवसांनी शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत या लायब्ररीची बातमी पोहचली. त्यानंतर त्यांनीही या बाल वाचनालयाला पुस्तकं भेट दिली. कालांतरानं, वास्तुविशारद विद्यार्थ्यांनी नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर इंडिया स्पर्धेअंतर्गत या लायब्ररीचं नूतनीकरण करण्याचा प्रकल्प निवडला. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रियदर्शिता सांगतात, '६० विद्यार्थ्यांच्या गटानं एका महिन्यात ही लायब्ररी तयार केली. यासाठी भंगारातील वस्तूंचा वापर करण्यात आला. भोपाळच्या भंगार बाजारातून जुने तुटलेले गेट, टिनाचे डबे, नायलॉनचे प्लास्टिकचे पत्रे आणण्यात आले. लायब्ररीत टिन बॉक्स बसवले गेले, ज्यात पुस्तकं ठेवता येतात.
दररोज सुमारे ३० मुलं वाचनालयात येतात : सुमारे ३००० पुस्तकं असलेल्या या वाचनालयाला 'किताबी मस्ती' असं नाव देण्यात आलंय. या वाचनालयात मुस्कान आणि स्वयंसेवक पंकज ठाकूर दररोज संध्याकाळी मुलांना शाळेचा गृहपाठ करायला मदत करतात. नंतर त्यांना वाचण्यासाठी पुस्तकं दिली जातात. पंकज सांगतात, 'येथे दहावीपर्यंतच्या मुलांना कोर्सची तयारी करून दिली जाते. वाचनालयात दररोज सुमारे ३० मुलं येतात'.
हेही वाचा :