नवी दिल्ली - देशाच्या राजकारण आणि समाजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटावणाऱ्या काही दिग्गजांनी या वर्षात अखेरचा निरोप घेतला. त्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अहमद पटेल, राम विलास पासवान यांचा समावेश आहे. याच्यासह अन्य मोठ्या नेत्यांसाठीही हे वर्ष अखेरचे ठरले. त्या बाबत घेतलेला हा आढावा.
प्रणव मुखर्जी
माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचेही निधन याच वर्षात झाले. ३१ ऑगस्ट २०२० ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ साली झाला होता. २०१२ ते २०१७ पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पद भुषवले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ते त्यातून सावरू शकले नाहीत. त्यातच त्यांचे निधन झाले. मुखर्जी यांनी राजकीय क्षेत्रात विवीध पदे भुषवली होती. त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यातही आले होते. काँग्रेसचे चाणक्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी राष्ट्रपती पद जरी भूषवले असले तरी त्यांनी पंतप्रधानपदाने वेळोवेळी हुलकावणी दिली होती.
अहमद पटेल
अहमद पटेल यांचे निधीन हे या वर्षातील काँग्रेस बरोबर देशासाठीही मोठा धक्का होता. सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद पटेल यांनी बजावलेली कामगिरी सर्वांच्याच लक्षात रहाणारी आहे. २५ नोव्हेंबरला गुडगांवच्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मेदांता रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांचे एकएक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचे निधन झाले. पडद्यामागचा रणनितीकार म्हणून त्यांची राजकारणात ओळख होती. ते ७१ वर्षांचे होते.
तरूण गोगोई :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी यांचे निधन झाले. कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागले. त्यात त्यांचे अवयव निकामी झाले आणि २३ नोव्हेंबर २०२० ला त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. २५ ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना तातडीने गुवाहाटीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोन महिन्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर अवयव निकामी होत गेल्याने त्यांचे निधन झाले.
राम विलास पासवान
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांचे निधन ८ ऑक्टोबर २०२० ला झाले. पासवान यांची ह्दय शस्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखे खाली होते. १० ऑक्टोबरला त्यांचे पार्थिव पाटण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले गेले. पासवान यांची ओळख देशातील सर्वाधिक बलवान दलित नेता अशी होती. पासवान यांनी केद्रातील बहुतांशी मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे.
सुरेश आंगडी
भाजपा नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांचेही निधन २३ सप्टेंबर २०२० ला झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते ६५ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १ जुन १९५५ साली झाली होता. कर्नाटकातील बेळगाव लोकसभा मतदार संघातून ते विजयी झाले होते. बेळगावमधूनच ते चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. २००४ पासून त्यांनी कधीही पराभवाचे तोंड पाहिले नाही. आंगडी यांनी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून १९९६ ला आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरूवात केली होती.
अमर सिंह
समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि खासदार अमर सिंह यांचे निधनही याच वर्षातले. त्यांनी सिंगापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. १ ऑगस्ट २०२० ला त्यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांना किडणीचा विकार होता. त्यासाठी त्यांच्यावर सिंगापूर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. २७ जानेवारी १९५६ साली उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे राजकीय आणि बॉलिवूड क्षेत्रात खुप चांगले संबध होते. अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यांचे जवळचे संबध होते.
लालजी टंडन
मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे निधन २१ जुलैला झाले. ते ८५ वर्षांचे होते. राजकारणात असताना त्यांनी प्रत्येक पक्षात आपले मित्र तयार केले होते. त्यांचे दरवाजे सर्वांसाठीच खुले असायचे. दिलदार राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती.
जसवंत सिंह
माजी केंद्रीय मंत्री जयवंत सिंह यांचे निधन २७ सप्टेंबर २०२० ला झाले. त्यांच्यावर बराच काळ दिल्लीच्या आर्मी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. ते १९८० ते २०१४ पर्यंत संसद सदस्य होते. राज्यसभेवर त्यांची पाच वेळा निवड झाली होती. तर चारवेळा ते लोकसभेत निवडून गेले होते. २००४ ते २००९ पर्यंत ते राज्यसभेत विरोधीपक्षनेते होते. जसवंत सिंह हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या अतिशय जवळचे होते.
अजित जोगी
छत्तिसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन ही याच वर्षातले. २९ मे ला त्यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. रायपूर येथील रूग्णालयात दाखल केल्यानंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सरकारी अधिकारी ते राजकारणी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. नोव्हेंबर २०००मध्ये छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान जोगी यांनाच मिळाला. २००३ मध्ये जोगी यांना सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर ते लोकसभेवर निवडून गेले होते. २००४ साली निवडणूक प्रचारा दरम्यान त्यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना कायमचेच व्हिलचेअरवर रहावे लागले. २०१६ साली जोगी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यांनी जनता काँग्रेसची निर्मिती केली.
मोतिलाल व्होरा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खजिनदार मोतीलाल व्होरा यांनी ही याच वर्षात जगाचा निरोप घेतला. २१ डिसेंबरला त्यांचे निधन झाले. 1972 ते 1990 पर्यंत सहावेळा मध्य प्रदेशमध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1993 ते 1996 पर्यंत उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. 1998 मध्ये व्होरा १२ व्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी राहिले. मोतीलाल व्होरा सन २००० ते २०१८ पर्यंत सलग काँग्रेसचे कोषाध्यक्ष राहिले आहेत. मोतीलाल व्होरा यांनी मध्यप्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद तर उत्तरप्रदेशचे राज्यपालपद भूषविले होते.