नवी दिल्ली - लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर दारुची दुकाने सुरू करण्यास राज्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे दारुच्या दुकानांबाहेर मद्यपींच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. पहिले दोन दिवस फक्त पुरष रांगेमध्ये उभे असल्याचे दिसत होते. आता महिलाही रांगेत दिसत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये दारु खरेदी करण्यासाठी महिलांचीही मोठी रांग दिसून येत आहे.
शहरातील कंझावल रोड परिसरातील बुद्ध विहार येथे महिलांचीही दारुच्या दुकानावर मोठी रांग लागली होती. या महिलांशी चर्चा केली असता त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. घरी पती आजारी असल्याने त्यांच्यासाठी दारु घेवून चालले आहे, असे एका महिलेने सांगितले. काही महिला तर बॉक्स भरून बाटल्या घरी घेवून जात आहेत. त्यामुळे पिण्यासाठी दारु घेवून जात आहेत, की विक्रीसाठी हा प्रश्न आहे.