पाटणा - बिहार राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असून अनेक जिल्ह्यांतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीने बाहेर काढत आहेत. दरम्यान, बुरी गंडक नदीच्या पाण्यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणत असताना एका महिलेची बोटीतच प्रसूती झाली.
पूर्व चंपारण जिल्ह्यातील गोबारी गावात नदीचे पाणी शिरले आहे. येथील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. य़ा गावातून एका गर्भवती महिलेला सुरक्षित स्थळी नेत असताना बोटीत महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्या. दुपारी दीडच्या सुमाराचे महिलेने एका मुलीला जन्म दिला. आपत्ती निवारण पथकाबरोबर आरोग्य कर्मचारीही बरोबर असल्याने गर्भवती महिलेला वेळेत मदत मिळू शकली.
एनडीआरएफची 9 वी तुकडी बचावकार्य करत असताना गावात एक महिला गर्भवती असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बचाव पथकाने गावात जाऊन महिलेला बोटीत बसवले. पूर क्षेत्रातून बाहेर आणत असताना महिलेची प्रसूती झाली. आई आणि बाळाला नंतर मोतिहारी जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एनडीआरएफच्या प्रवक्त्याने दिली.
2013 पासून बचावकार्य करत असताना बोटीमध्ये 10 महिलांची प्रसूती झाली आहे. एका महिलेने जुळ्या बाळांना बोटीत जन्म दिला होता. एनडीआरएफच्या जवानांना आणीबाणीच्या परिस्थितीत प्रसूती कशी करायची याचेही प्रशिक्षण दिलेले असते, असे प्रवक्त्याने सांगितले. बिहार राज्यात पूराने थैमान घातले असून 21 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.