कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्या वाढतच आहे. कोरोना संक्रमण रोखण्यात सरकार अपयशी ठरल्यावरून विरोधकांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. मला कोरोनाची लागण झाली तर, मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते अनुपम हाजरा यांनी केला आहे. तथापि, हे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. वादग्रस्त वक्तव्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून सिलिगुडीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तसेच तृणमूलच्या नेत्यांकडून सिलिगुडीमध्ये भाजप नेते हाजरा यांच्याविरुद्ध मोर्चा काढण्यात आला.
'मला कोरोनाची बाधा झाली तर, मी ममता बॅनर्जी यांची भेट घेईन आणि त्यांना मिठी मारेन. यामुळे त्यांना कोरोनाग्रस्तांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाची जाणीव होईल, असे ते म्हणाले. दक्षिण 24 परगणातील बरईपूर येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अनुपम हाजरा यांना पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांपैकी बऱ्याच जणांनी चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते.
कोरोनाचे संकट कमी न होता उलट त्याचे गांभीर्य वाढत चालले असताना, केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकूले आहे. भाजपाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सभांचा धडाका लावला आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होणार आहे.