नवी दिल्ली - भारत आणि जपानमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसाठी लवकरच तारखा निश्चित करण्यात येतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली.
आम्ही जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कात आहोत. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या बोलणीमधून, लवकरच जपान-भारत शिखर परिषदेच्या तारखा निश्चित करण्यात येतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, की डिसेंबरमध्येच या परिषदेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, ते पुढे ढकलण्यात आले. या मुद्द्यावर जपानशी चर्चा सुरू आहे.
डिसेंबर १५ ते १७ च्या दरम्यान, गुवाहाटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांची भेट होणार होती. मात्र, त्यादरम्यान नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधी ईशान्य भारतात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, जपानने ही भेट रद्द केली होती.
कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबरला टोकियोमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये भारत आणि जपानमध्ये निरस्त्रीकरण, अप्रसार आणि निर्यात नियंत्रण या विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील ही आठवी औपचारिक द्विपक्षीय चर्चा होती. याचवेळी हे ठरवण्यात आले, की शिखर परिषदेसाठी दोन्ही देशांना सोयीस्कर पडतील अशा तारखा निश्चित करण्यात याव्यात.
हेही वाचा : भारत आणि 'उगवत्या सूर्याचा देश'...