लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लेह-लडाखचा दौरा केला. यावेळी त्यांनी गलवान खोऱ्यातील झटापटीत जखमी झालेल्या सैनिकांची भेट घेतली. आपला देश यापूर्वीही कधी कोणापुढे झुकला नाही, आणि यापुढेही कधी कोणत्या महाशक्तीपुढे झुकणार नाही. तुमच्यासारख्या शूर जवानांमुळेच मी हे अगदी आत्मविश्वासाने म्हणू शकतो, असे यावेळी मोदी या जवानांना म्हटले.
"मी इथे तुम्हा सर्वांना धन्यवाद म्हणण्यासाठी आलो आहे. आपला देश आता आत्मनिर्भर होत आहे. तुम्हा सर्वांप्रती, आणि तुमच्यासारख्या वीरांना जन्म देणाऱ्या तुमच्या मातांप्रती मी आदर व्यक्त करतो. तसेच, सर्वकाही लवकरच ठीक होईल, अशी आशा व्यक्त करतो. आपल्याला जे सोडून गेले, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुमची शौर्यगाथा ही पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल", असे पंतप्रधान या जवानांना म्हणाले.
"तुम्ही सर्वांनी जे प्रत्युत्तर दिले, जे शौर्य गाजवले त्याबाबत संपूर्ण जगात गाजावाजा होत आहे. तुम्ही रुग्णालयात असल्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, परंतु १३० कोटी भारतीय तुमच्या शौर्याचे कौतुक करत आहेत, आणि त्यांना तुमचा अभिमान आहे. संपूर्ण जगाला आज माहिती करुन घ्यायचे आहे, की देशातील हे शूर योद्धे कोण आहेत?, त्यांनी कोणती ट्रेनिंग घेतली आहे?", असेही ते पुढे म्हणाले.
मागील महिन्यात १५ तारखेला भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान भीषण झटापट झाली होती. यामध्ये देशाच्या २० जवानांना वीरमरण आले होते, तर कित्येक जवान गंभीर जखमी झाले होते. यानंतर भारत-चीन सीमेवरील तणाव आणखीच वाढला असून, यासंबंधी उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. यातच, आज पंतप्रधान मोदींनी अचानकपणे लेह-लडाखला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, जवानांशी संवाद साधत त्यांचे मनोधैर्यही उंचावले.
हेही वाचा : लडाखमधील चीनबरोबरच्या सीमावादात जपानचा भारताला पाठिंबा