अनंतपूर (आंध्रप्रदेश) - देशात आजही प्रेमाला पाप समजले जाते. त्यात हे प्रेम जर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असेल तर बोलायलाच नको. यातुन बऱ्याचवेळा हिंसेचा प्रकार घडतो. आंध्रप्रदेश राज्यातील केपीडोड्डी या गावात असाच एक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुला-मुलीने प्रेम केले म्हणून गावच्या सरपंचाने पंचायत भरवून गावकऱ्यांसमोर त्यांना काठीने आणि पायाने तुडवत बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.
प्रेमाला कुठल्याच जाती-धर्माची सीमा नसते. मात्र, जुन्या विचारांमुळे अशा प्रेमाला अडथळा निर्माण होतो. त्यातूनच हिंसक घटना घडतात. आतापर्यंत आंतरजातीय प्रेम विवाहातून बऱ्याच हत्या झाल्या आहेत. अजुनही असे हिंसक प्रकार चालुच आहेत. अशातच मन हेलावणारी घटना समोर आली. यासंबंधीचा व्हिडीओ समाज माध्यमावर वायरल झाला असून त्यावर नाराजीचा सूर उमटत आहे.
व्हिडीओमध्ये गावचा सरपंच भर पंचायतीमध्ये त्या अल्पवयीन जोडप्याला लाथा बुक्क्याने झोडपताना दिसत आहे. यावेळी इतर गावकरी गुपचूप बसून हा सर्व प्रकार पाहत आहेत.