नवी दिल्ली - पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाईदलाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे अमेरिकेकडून समर्थन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पे यांच्यामध्ये बुधवारी रात्री फोनवरुन भारत-पाक सीमातणावासंबधी चर्चा झाली. त्यावेळी त्यांच्याकडून कारवाईला समर्थन असल्याचे सांगण्यात आले.
पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानमधील जैशच्या दहशतवादी तळांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स या देशांकडून याआधीच समर्थन देण्यात आले आहे. बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ यांनी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर सुरू असलेले दहशतवादी तळ नष्ट करण्यास सांगितले. असे केले तरच दोन्ही देशातील तणाव कमी होऊ शकतो, असे पॅम्पिओ यांचे मत आहे. त्याबरोबरच अमेरिकेकडून पाकिस्तान सरकारला तीव्र शब्दात खडसावण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी. शिवाय भारतासोबत असलेला सीमा संघर्ष चर्चेतून सोडवावा, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे.
भारत-पाक सीमेवर काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. हा तणाव लष्करी कारवाईतून सोडवता येणार नसून यामुळे संघर्ष वाढू शकते. दोन्ही देशांनी त्यांच्यातील प्रश्न चर्चेतून सोडवावे असे अमेरिकेकडून एएनआय या वृत्तसंस्थेला सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी आम्ही पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी चर्चा केली आहे. सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशा कुठलाही कारवाईला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन पाकिस्तानला केले असल्याचे माइक पोम्पिओ यांनी म्हटले होते.
