जबलपूर - राम मंदिरासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोंव्हेंबरला जाहीर केला आहे. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर करण्यासाठी एका वृद्ध महिलेने तब्बल 27 वर्ष उपवास केला आहे. उर्मिला चतुर्वेदी असे या 81 वर्षीय वृद्ध महिलेचे नाव असून त्या मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये राहतात.
1992 मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडल्याची माहिती उर्मिला यांना समजली, तेव्हापासून म्हणजे 1992 ते 2019 पर्यंत उर्मिला यांनी उपवास चालू ठेवला होता. अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी मार्ग जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत उपवास करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यानुसार गेले 27 वर्ष उर्मिला या जेवण न करता फक्त फळांवरच आपला दिवस ढकलत होत्या. केलेल्या या व्रतावरुन उर्मिला यांची लोकांनी चेष्टा केली. काहीनी तर तुझ्या उपवासाच्या व्रतामुळे राम मंदिर खरच तयार होणार का? असा प्रश्न विचारत व्रताचा हट्ट सोडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, उर्मिला यांनी हा उपवास सुरूच ठेवला. अखेर 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी निकाल जाहीर केला असून यात उर्मिला यांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.
दरम्यान, राम मंदिर स्थापन करण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर उर्मिला यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा उपवास सोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, उपवास हा अयोध्येत जाऊनच सोडणार असल्याचे उर्मिला यांनी कुटुंबीयांना सांगितले. या उपवासामुळे उर्मिला यांची तब्येत ढासळली असली तरी त्यांनी केलेल्या संकल्पाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
उर्मिला यांनी हिंदी साहित्यामध्ये एमए केले असून त्या हिंदी विषयाच्या शिक्षिकाही होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उर्मिला यांना आनंद झाला असून यातून हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश आपण जगाला दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.