कानपूर - प्रियंका गांधी यांनी आपल्या पतीवर जमीन व्यवहारासंबंधी जे वादविवाद आहेत, ते सोडवावेत आणि आपले सोनभद्र प्रकरणी राजकीय नाटक बंद करावे. त्यांनी याआधी आदिवासी गरीब लोकांमध्ये वेळ घालवला नाही, अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली आहे. ते आज कानपूर विश्रामगृहावर कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.
आपला पक्ष जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजप जिल्हावार सदस्यता अभियान राबवत आहे. यानिमित्त मौर्य आज गोविंदनगर विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी तेथील विकास कामांचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या.
सोनभद्र घटनेवर केशव प्रसाद यांनी सांगितले, की भाजपने कधीच असे म्हटले नाही की, गुन्हेगारीच्या घटना संपल्या आहेत. जर कोणीही लहान किंवा मोठा गुन्हा केला तर त्याला शिक्षा होईलच, कोणीही त्याला वाचवू शकणार नाही. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सोनभद्रमधील घटना दुर्दैवी आहे. मात्र, सरकारने सर्व आरोपींना पकडले आहे. या घटनेचा तपास केला जात असून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती मौर्य यांनी दिली.