लखनऊ - उत्तर प्रदेशातील बहुचर्चीत उन्नाव रेप प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. सीबीआयने पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणात आरोपी कुलदीप सिंह सेंगर याच्या विरोधात आरोप निश्चित केले आहेत. उन्नाव रेप पीडितेच्या वडिलांचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला होता. याप्रकरणी 10 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
कुलदीप सिंह सेंगर सोबतच माजी पोलीस स्टेशन प्रभारी अशोक सिंह भदौरिया यांनाही आरोपी ठरवण्यात आले आहे. तसेच सब-इंस्पेक्टर कामद प्रसाद सिंह, काँस्टेबल आमिर खान, कुलदीप सिंह सेंगर याचा भाऊ अतुल सिंह सेंगर यांच्याविरोधातही पोलिसांनी आरोप निश्चित केले आहेत.
पीडितेच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई
उन्नाव रेप पीडितेच्या दुर्घटनेप्रकरणी सीबीआयने अनेक खुलासे केले आहेत. पीडितेच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या 3 ते 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या बजावले नाही. ते फक्त पीडितेच्या घरी जाऊन हस्ताक्षर करण्याचे काम करायचे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे निश्चित आहे, असे सीबीआयने म्हटले आहे.
अपघातास कारणीभूत असणारा ट्रक चालक आणि क्लीनर यांना सीबीआयने नार्को टेस्ट आणि ब्रेन मैपिंगसाठी गांधीनगर येथे नेले आहे. बुधवारी चालक आणि क्लीनरची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे सीबीआय न्यायालय या दोघांची पोलीस कोठडी वाढवण्याची शक्यता आहे.