नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल. मात्र, ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी न होता, व्हिडिओ कॉन्फरंसिंगवर पार पडणार आहे.
कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगवर भर देण्याबाबत सरकार नागरिकांना वारंवार सांगत आहे. त्यामुळेच या बैठकीसाठीही मंत्रीमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्याचे टाळण्यास सांगितले आहे. त्याऐवजी आजची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने, म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे होणार आहे. हे मंत्री आपापल्या कक्षांमधून पंतप्रधानांशी संवाद साधतील. या बैठकीमध्ये लॉकडाऊन आणि लॉकडाऊन नंतर काय पाऊले उचलली पाहिजेत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
याआधी लॉकडाऊनदरम्यानही देशातील शेतीची, पेरणीची कामे सुरळीतपणे चालू रहावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले आहेत. शेतीची यंत्रसामग्री, त्याचे सुटे भाग विकणारी दुकाने तसेच, गरजेच्या वस्तूंची ने-आण करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या ट्रकांसाठी सर्व ट्रक दुरूस्ती करणारी दुकानेदेखील लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक म्हणून सुरू राहतील, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारतातील कोरोनाच्या रुग्णांनी चार हजारांचा टप्पा गाठला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ४,०६७ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा : मोदींच्या आवाहनाला आईचाही प्रतिसाद, हीराबेन यांनी घरात लावली पणती