रत्नागिरी - कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कोकणातील संपत्तीचा लवकरच लिलाव होणार आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात दाऊद इब्राहिमची संपत्ती असून मागील वर्षी त्याच्या संपत्तीची मोजदाद करण्यात आली होती. दाऊद मुळचा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील मुंम्बके गावातील असून तेथे त्याचा बंगला आणि जमिन आहे.
कोकणासहीत देशात अनेक ठिकाणी दाऊदच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता आहेत. खेड तालुक्यातील सर्व संपत्ती त्याची बहीण हसीना पार्कर आणि आई अमिनाच्या नावावर आहेत. खेडमधील दाऊद कुटुंबाची मुख्य संपत्ती त्याची बहीण हसीना पार्करच्या नावावर आहे. तर इतर ठिकाणांवरील संपत्ती त्याची आई हसीनाच्या नावावर आहे.
१९९३ साली मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर कोकणातील हा बंगला ओसाड पडला. सध्या ही इमारत मोडकळीस आलेली आहे. अनेक वर्षांपासून हा बंगला कोणीच वापरत नसल्याने परिसरात जंगल पसरले आहे. तीन मजल्याची ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळले अशा अवस्थेत आहे. मागील वर्षी या संपत्तीचे मोजणी झाली होती. उत्पादन शुल्क विभाग आणि सरकारी अधिकारी खेड तालुक्यातील दाऊदच्या गावात ठाण मांडून होते. या संपत्तीचा आढावा घेऊन याची किंमत ठरविण्यात आली होती. आता या संपत्तीचा लिलाव होणार आहे.