नवी दिल्ली - युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधारकार्ड अद्यावत करण्यासंबधी मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या सामान्य सेवा केंद्राद्वारे (CSC) आधार कार्ड अपडेट करत येणार आहेत. ही परवानगी 20 हजार केंद्रांना देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सेंटर्स ग्रामीण भागात बँकिंग सेवा देण्यासाठी चालू करण्यात आली आहेत.
या 20 हजार सामान्य सेवा केंद्रांना "बँकिंग करस्पॉन्डंट" चा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या या केंद्राद्वारेही नागरिकांना आपले आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. केंद्रीय दुससंचार आणि कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली.
UIDAI च्या निर्देशानुसार कॉमन सर्व्हीस सेंटर्सने आधार अद्ययावत करण्याचे काम सुरू करावे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या लोकसंख्येला आधार सेवा घराजवळ मिळेल, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. हे सेंटर्स सुरू करण्यासाठी जूनपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
आधार अपडेट करण्यासाठी बँकिंग कॉमन सर्व्हिस सेंटर्सनी सर्व तांत्रिक आणि इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, युआयडीएने सांगितल्यानुसार सर्व तयारी करून घ्यावी असे सीएससीचे कार्यकारी संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले.