अजमेर - सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांच्या दर्ग्यावर 809 वा वार्षिक उरूस उत्सव सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यात चादर चढवण्यात आली. ही चादर घेऊन महाराष्ट्रातील युवा नेते राहुल कनाल आपल्या संपूर्ण टीमसह अजमेर शरीफ येथे पोहचले. निजाम गेटवरून डोक्यावर चादर ठेऊन ते दर्ग्यात पोहचले. देशातील शांततेसाठी आणि शिवसेना कायम मजबूत राहावी, यासाठी पार्थना केल्याचे राहुल कनाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरवर्षी ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुस दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावतीने चादर चढवण्यात येते. यंदा उरुस ( यात्रा ) सुरू होण्यापूर्वीच चादर चढवण्यात आली आहे. गेल्यावर्षीही राहुल कनाल यांच्याच हस्ते भगवी चादर मातोश्रीवरून अजमेर शरिफला पाठवण्यात आली होती. गेली आठ वर्षे मातोश्रीवरून अजमेर येथील दर्ग्याला चादर पाठवली जाते.
भारतीय उपखंडात सुफी संतांचा मोठा वारसा -
विश्व विख्यात सुफींच्या चिश्ती या संप्रदायाचे भारतातील संस्थापक सुफींच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी हे मूळचे पर्शिया म्हणजेच इराणचे आहेत. त्यांनी राजस्थानधील अजमेर येथे राहून कार्य केले. त्यांच्या अजमेर येथील गरीब नवाज दग्र्यापुढे लोक अद्यापही नतमस्तक होतात. या दर्ग्याला अनेक नेते भेट देतात. भारतीय उपखंडात सुफी संतांचा मोठा वारसा आहे. यातून भारत हे बंधुता आणि प्रेमाचे केंद्र बनले. सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी प्रेम आणि सद्भावनेचा संदेश दिला आहे. सूफी पंथात अनेक संप्रदाय असले तरी भारतीय उपखंडात प्रमुख चार संप्रदाय प्रचलित होते. त्यापैकी चिश्ती संप्रदाय, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी भारतामध्ये आणला.