श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यादरम्यान चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दरम्यान लष्कराच्या एका जवानास वीरमरण आले आहे. एनकाऊंटरनंतर शोधमोहिम सुरू केल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले.
ताहिर अहमद भट असे मृत दहशतवाद्याचे नाव आहे. भट हा दक्षिण काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील मलंगपोरा येथील रहिवासी आहे. ताहिरचा मृत्यू हा मुजाहिद्दिनसाठी मोठा आघात असून हे आपल्या सुरक्षा दलाचे यश असल्याचे पोलीस अधिकारी मुकेश सिंग यांनी सांगितले. 'शनिवारी रात्री संयुक्त कारवाई करण्यात आली. खेड्यातील गावात हिज्बुलचा दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार कारवाई केली', असे आयजीपी यांनी माध्यमांना सांगितले.
गेल्यावर्षी भटचा दहशतवादी गटांशी संपर्क आल्यानंतर त्याने त्यात सहभाग घेतला. चेनाब व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यास भटला त्याच्या प्रमुखांनी सांगितले होते. लोकांमध्ये भीती निर्माण करून वातारवण बिघडवण्याचा भटचा कट होता, असेही पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलांवर हल्ला चढवण्याची योग्य रणनिती भटने आखली होती. यापूर्वीही भट अनेक गुन्ह्यात पोलिसांना वाँटेड होता, असेही पोलिसांनी सांगितले. यावर्षीची जम्मू काश्मिरच्या डोडा जिल्ह्यातील दहशतवादी आणि सुरक्षा दलातील ही दुसरी चकमक होती.