मुंबई - मागील २४ तासांमध्ये देशात नव्या 15 हजार 968 कोरोना रुग्णांची भर पडली आहे... केंद्र सरकारने फ्रान्समध्ये होणाऱ्या 'कान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पेव्हॅलियनच्या मार्केट सेक्शनमध्ये दाखवण्यासाठी मराठी सिनेमा 'माई घाट : क्राइम नं.१०३/२००५' आणि गुजराती सिनेमा 'हालेरो' यांची निवड केली आहे... आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे... अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांनी 15 हजाराचा आकडा पार केला. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या 4 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 15 हजार 968 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 465 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - गेल्या 24 तासांत आढळले 15 हजार 968 कोरोनाबाधित ; तर 465 जणांचा बळी
- चंद्रपूर - कोरोनामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पूर्णपणे बदलावा लागला आहे. बड्या कंपन्यांत मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्यांना कधी आपल्यावर बेरोजगारीची वेळ येणार हे स्वप्नातही वाटले नसेल. पण, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे, असे झाले. यात अनेकांना नैराश्याने ग्रासले. यामुळे काहींनी मृत्यूला देखील कवटाळले. पण, काहींनी हे नैराश्य झटकून नव्या उमेदीने नव्या जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. त्यातीलच एक म्हणजे पलाश जैन हा युवक. मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या पलाशने कोरोनाच्या काळात नोकरी गमावली आता तो इडली विकून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्याची जिद्द परिस्थितीसमोर हताश झालेल्या हजारो युवकांना नवी उमेद देणारी ठरणार आहे.
सविस्तर वाचा - आनंदी नाही पण समाधानी आहे ! टाळेबंदीत नोकरी गेलेल्या अभियंत्याची कहाणी
- मुंबई - फ्रान्समध्ये होणाऱ्या 'कान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पेव्हॅलियनच्या मार्केट सेक्शनमध्ये दाखवण्यासाठी केंद्र सरकारने दोन सिनेमाची निवड केलेली आहे. यात मराठी सिनेमा 'माई घाट : क्राइम नं.१०३/२००५' आणि गुजराती सिनेमा 'हालेरो' यांची निवड निश्चित करण्यात आली असल्याची घोषणा केंद्रिय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - 'माई घाट' या मराठी चित्रपटाची 'कान' फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड
- पुणे - लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि काही नोकऱ्या वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. मात्र आपली जबाबदारी ओळखून, या काळात पुण्यातील २४ वर्षीय तरुणीने, घरीच केक तयार करुन त्यांची विक्री केली. त्यातून तिने तब्बल एक लाखाची कमाई केली. प्रिया शिळसकर असे त्या तरूणीचे नाव आहे.
सविस्तर वाचा - लॉकडाऊन काळात घरात बसून २४ वर्षीय प्रियाने कमावले 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे
- अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना मंगळवारी (23 जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. नवाजीस अहमद ( वय 9 ), दानेश अहमद ( वय 13 ), अरबाज अहमद ( वय 21 ), फैसल अहमद ( वय 18 ) असे मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत.
सविस्तर वाचा - दुर्दैवी..! पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावंडांना जलसमाधी
- नवी दिल्ली - देशातील नागरिक कोरोना या महामारीशी लढत असतानाच त्यांना आता महागाईचाही सामना करावा लागत आहे. गेल्या 18 दिवसांपासून सतत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज (बुधवारी) नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 79.76 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 79.88 रुपये प्रति लीटर झाला आहे. आज पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचा दर वाढला असून डिझेलचा दर 48 पैशांनी वाढला आहे तर पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली नाही.
सविस्तर वाचा - पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर महागले; 48 पैशांनी डिझेल दरात वाढ
- ठाणे - एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण किती मोठे भाई आहोत, हे सिद्ध करण्यासाठी काही गुंडानी एका तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केली. ही घटना श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मारहाण करणाऱ्या पाच तरुणांपैकी दोन तरुण अल्पवयीन आहेत. त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक...! ठाण्यात तरूणाला विवस्त्र करून मारहाण; दोन जणांना अटक
- कोल्हापूर - शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वाजवी दरात, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात यामध्ये हयगय होईल, त्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वाचा - शेतकऱ्यांना खते अन् बियाणे वाजवी दरात देण्याची राज्य शासनाची भूमिका
- जळगाव - कोरोनामुळे खासगी ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात सापडला आहे. टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून जळगावातील सुमारे दीड हजार लक्झरी बसेस जागेवरच उभ्या आहेत. अशा परिस्थितीत कर्जाचा हप्ता, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार तसेच रोड टॅक्स कसा भरावा? असा प्रश्न ट्रॅव्हल्स व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची चाके रुतल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे एक लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना काहीतरी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - टाळेबंदी : चाके थांबली अन् ट्रॅव्हल्स व्यवसायही थांबला, व्यवसायिकांची सरकारकडे मदतीसाठी साद
- नांदेड - तालुक्यातील धनगरवाडी येथील एका तरुणीचा खून केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध भरत गायकवाड याच्याविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 23 जून) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा - नांदेड : तरुणीच्या हत्येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल