जयपूर - डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. अलवरमध्ये एका खाजगी रुग्णालयात पैशाच्या लालचेत मृत झालेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारींना चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाच्या बेपर्वा कारभारामुळे गेल्या तीन दिवसांपासून शविच्छेदन प्रकिया रखडली होती.
वीरसिका गावामधील असलम हा एका ट्रकवर कंडक्टर म्हणून काम करत होता. इंदूरकडून दिल्लीला येताना एका अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला अलवरमधील एका खाजगी पंकज रुग्णालयात दाखल केले. 17 डिसेंबरपर्यंत डॉक्टरांनी असलमला आयसीयूमध्ये ठेवले. यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली नाही. रुग्णालय प्रशासनाने आठ लाख रुपये उपचाराच्या नावाखाली कुटुंबीयांकडून उकळले. जेव्हा पैसे संपले तेव्हा, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृतदेह सोपवला, असा आरोप असलमच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शवविच्छेदन प्रकिया रखडली -
मृतदेह घेऊन कुटुंबीय मेवतला पोहचले. तेव्हा ज्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. त्याच ठिकाणी शवविच्छेदन होईल, असे मेवत पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा असलमचा मृतदेह अलवरमधील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. शहरातील पंकज रुग्णालयातच असलमचा मृत्यू झाला, हे आयडेंटिफाय करण्यासाठी शासकीय डॉक्टरांनी पंकज रुग्णालयातील डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले. जेव्हा कुटुंबीयांनी पंकज रुग्णालय गाठले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तब्बल 7 तासानंतर असमलचे शवविच्छेदन करण्यात आले.
रुग्णालयाविरोधात तक्रार -
पंकज रुग्णालयाविरोधात असलमच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारींना चौकशीचे आदेश दिले आहेत. पंकज रुग्णालयाच्या संचालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या असून तक्रारही दाखल झाल्या आहेत. मात्र, आजपर्यंत रुग्णालयावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
हेही वाचा - पर्यटकांना खुणावत आहे गोठलेले दाल सरोवर