चेन्नई - मुळचे तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरुची जिल्ह्यातील एका व्यक्तीचा संयुक्त अरब अमिरातमध्ये नुकताच मृत्यू झाला आहे. मृतदेह भारतात आणण्यास सरकारने मदत करावी, अशी मागणी मृत व्यक्तीच्या पत्नीने सरकारकडे केली आहे. बालचंदर(44) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बालचंदर यांनी आत्महत्या केली असल्याचे माहिती बालचंदर ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीने सांगितले आहे. मात्र, कुटुबीयांचा यावर विश्वास नसून त्यांनी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
मागील 16 वर्षांपासून बालचंदर इलेक्ट्रीशियन म्हणून युएईतील एका खासगी कंपनीत काम करत होते. कंत्राटी पद्धतीने अबुधाबी येथील 'अल कुद्रा फॅसिलिटीज' या कंपनीत ते कामाला होते. नुकतीच त्यांची सुपरवाईजर पदावर बढती झाली होती. एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करत असले तरी मागील सहा महिन्यांपासून नीट वेतन दिले जात नव्हते, असे बालचंदर यांच्या पत्नी नंदींनी यांनी सांगितले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरही त्यांना बळजबरीने काम करावे लागत असल्याचेही त्या म्हणाल्या.
अबुधाबी शहरात निर्जुंतीकीकरण करण्याचे काम माझे पती आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यांनी हे काम करण्यास नकार दिला होता. मात्र, सुपरवाईजर असल्याने त्यांना हे काम करावे लागले. नंतर काही दिवसांनी या सर्वांना फ्ल्यू सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सर्व कामगारांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी सुरक्षा उपकरणेही स्वत:च्या पैशाने खरेदी केले होते. कंपनीकडे याबाबत तक्रार केली असता, त्यांना धमकी देण्यात आली होती.
रुग्णालयामध्येही त्यांची योग्य काळजी घेण्यात येत नव्हती, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. एप्रिल 3 रोजी बालचंदर यांनी त्यांच्या पत्नीशी फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी 15 लाखांचा पगार थकलेला असल्याचे सांगितले होते. मात्र, 6 एप्रिलनंतर दोघांमध्ये सवांद झाला नाही. कंपनीशी संपर्क साधला असता, बालचंदर यांनी रुग्णालयातील खोलीमध्ये आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र, यावर त्यांच्या पत्नीचा विश्वास नाही. ईटीव्ही भारतशी बोलताना नंदीनी यांनी आपली व्यथा मांडली.
पतीच्या मृत्यूवर पत्नी नंदीनी यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी कंपनीशी संपर्क साधून चौकशी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पतीचा मृतदेह सरकारने भारतात आणण्यासाठी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. बालचंदर यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.