दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे २ आणि कमुनिस्ट पक्षाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथे झालेल्या भाजप कार्यक्रमात आमदारांसोबत जवळपास ५० ते ६० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पक्षात प्रवेश केलेल्या आमदारांचे आणि नगरसेवकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, यापुढेही अनेक आमदार आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार आणि नगरसेवकांनी केलेला भाजप प्रवेश तृणमूलसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. तृणमूलचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा बातम्या येत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये २०२१ पर्यंत सरकार असतानाही ममतांनी पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.