अमरावती(तिरुपती) - आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानातील एका कर्मचार्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे दोन दिवस भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. तिरुपती देवस्थानातील हा कोरोनाचा पहिलाच रूग्ण आहे. या ठिकाणी एकूण ७ हजार कायमस्वरूपी कर्मचारी तर १२ हजार कंत्राटी कर्मचारी काम करतात.
अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारपासून राज्यातील देवस्थाने पुन्हा सुरू करण्यात आली. तिरुपतीमंदिर देखील भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, आता मंदिरातील कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याने दोन दिवसांसाठी पुन्हा दर्शन बंद करण्यात आले आहे. या दरम्यान, मंदिरातील धार्मिक विधी नियमित सुरू राहतील, अशी माहिती देवस्थान समितीतील एका सदस्याने दिली.
मंदिर परिसराची, मंदिराची आणि देवस्थानच्या कार्यालयांचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण केल्यानंतर रविवारपासून भाविकांना पूजेसाठी परवानगी देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांना शोधले असून त्यांची कोरोनाचाचणी घेण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झालेला हा कर्मचारी देवस्थानच्या आरोग्य विभागात कार्यरत आहे.