लखनौ - पिलिभीत व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका २८ वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. माला कॉलनीमध्ये राहणाऱ्या कृष्णराज, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यावर्षी या प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात झालेला हा चौथा मृत्यू आहे.
या घटनेनंतर लॉकडाऊनचा आदेश धुडकावत मोठ्या संख्येने गावकरी आंदोलन करत होते. प्रशासन वाघांपासून होत असलेल्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आहे. वाघांपासून होणाऱ्या हल्ल्यांपासून प्रशासनाने गावकऱ्यांना संरक्षण पुरवावे, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
वाघाने कृष्णराजच्या मानेवर हल्ला केला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आम्ही गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती गजरौला पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस अधिकारी जय वीर सिंह यांनी दिली. तसेच, पिलिभीत सदरचे तहसीलदार विवेक कुमार मिश्रा यांनी मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली.
यापूर्वी याच महिन्यात रामोली सरकार या ५० वर्षीय महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
हेही वाचा : लॉकडाऊन : घर गाठण्यासाठी गर्भवती महिलेची २०० किमीची पायपीट