नवी दिल्ली - स्टार्टअप या शब्दाने गेल्या दशकभरात विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. आजघडीला देशात सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात सुरु झाले आहेत. तब्बल 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकात देखील 2 हजार 847 स्टार्टअप सुरु झाले आहेत.
केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने 24 जून रोजी देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. तर कर्नाटक 2 हजार 847, दिल्ली 2 हजार 552, उत्तरप्रदेश 1 हजार 566 तर तेलंगण 1 हजार 80 स्टार्टअपसह पाचव्या स्थानावर आहे.
तरुणाईमध्ये स्टार्टअपची क्रेझ आहे. यशस्वी उद्योगांतून मिळणारी प्रेरणा, दूरसंचार क्रांती आणि मोबाईलच्या सर्वदूर वापरामुळे तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपना मिळणारा मोठा ग्राहकवर्ग, सोप्या रीतीने होणारा पतपुरवठा, उद्योगपूरक वातावरणनिर्मिती इत्यादीमुळे स्टार्टअपचा वेग वाढला आहे.