मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. पादचारी पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यात ५ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात भारतात पूल कोसळल्याने झालेल्या सर्वात मोठ्या दुर्घटना.
१ डिसेंबर २००६ ला बिहारच्या भागलपूर जिल्ह्य़ात १५० वर्षांच्या जुन्या पुलावरून ट्रेन जात असताना पूल कोसळला होता. या दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये १४ महिला आणि २ मुलांचा समावेश होता. तर या घटनेत ५० हून अधिक जण जखमी होते.
९ सप्टेंबर २००७ला हैदराबादतल्या पंजागुट्टा जंक्शन परिसरातला फ्लाय ओव्हर कोसळल्याने २० जणांना जीव गमवावा लागला होता. तर यात २० जण जखमी झाले होते. या फ्लाय ओव्हरचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती.
१२ जुलै २००९ला दिल्लीतला मेट्रो पूल कोसळला होता. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता तर १३ जण जखमी होते.
७ फेब्रुवारी २०१३ला मुंबईतला विमानतळ परिसरातला पूल कोसळला होता. या दुर्घटनेत ३ जणांना जीव गमवावा लागला होता तर ७ जण जखमी झाले होते.
२७ नोव्हेंबर २०१३ला बिहारमधल्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मरिपूर परिसरात पूल कोसळला होता. यात १४ जण जखमी झाले होते. मालवाहक ट्रेन गावातून जात असताना पूल कोसळल्याने ही दुर्घटना झाली होती.
१० जुन २०१४ला सुरत मधल्या परेल परिसरातला बांधकाम सुरू असलेला फ्लाय ओव्हर कोसळला होता. या दुर्घटनेत ३ मजुरांचा मृत्यू झाला होता. तर ६ जण जखमी झाले होते.
३१ मार्च २०१६ला कोलकात्यातला विविकानंद फ्लाय ओव्हर बांधकाम सुरू असताना कोसळला होता. या दुर्घटनेत २६ जणांना जीव गमवावा लागला होता. ही दुर्घटना बिरा बाजार या गर्दीच्या भागात झाली होती.
१५ मे २०१८ ला वाराणसीतला फ्लाय ओव्हरचे काम सुरू असताना पिलर कोसळून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत १९ जणांना जीव गमवावा लागला होता. तर १२ जण जखमी झाले होते.
४ सप्टेंबर २०१८ला कोलकात्यातला मझहरत पूल कोसळला होता. या दुर्घटनेत ३ जणांना जीव गमवावा लागला होता.